मी केवळ शांत राहिलो

मी जे पाहिले, जे ऐकले
केवळ सोशीत राहिलो
ना बोललो, आक्रन्दीलो
मी केवळ शांत राहिलो

मानवत्व जाताना लयास
ते उग्रतेने मी पाहिलो
दोन अश्रू मीच माझे
अग्निस त्याच्या वाहिलो
पण
ना बोललो, आक्रन्दीलो
मी केवळ शांत राहिलो

देव जाणे कित्येक वर्षे
स्वतःशी खोटा राहिलो
ही शांतता खोटीच आहे
हे सांगताना मी स्तब्धलो
पण
ना बोललो, आक्रन्दीलो
मी केवळ शांत राहिलो

ना बोलणे ह्यांच्या प्रति
ना बोलणे त्यांचा प्रति
ना दुःख ह्यांना राहिले
ना दुःख त्यांना जाहले
मग मीच साधु राहिलो
म्हणून
ना बोललो, आक्रन्दीलो
मी केवळ शांत राहिलो

किंतु कोणती ही साधुता
ही श्रेष्ठता, विशिष्टता
नीतीस जेंव्हा त्यागता
ही कनिष्ठ प्राप्त शांतता
हे कळता न कळून राहिलो
तरी
ना बोललो, आक्रन्दीलो
मी केवळ शांत राहिलो

मी त्यागताना स्वत्व माझे
मी स्वतःला पाहिलो
मी त्यागताना आत्म माझे
मी स्वतःला पाहिलो
प्रतिमा न माझी मानावासम
कंकाल केवळ ल्यायलो
पण
ना बोललो, आक्रन्दीलो
मी केवळ शांत राहिलो

मी जे पाहिले, जे ऐकले
केवळ सोशीत राहिलो
ना बोललो, आक्रन्दीलो
मी केवळ शांत राहिलो

नियाज मुलाणी

साधु – Good, साधुता – Goodness ह्या अर्थी वापरले आहेत.

सोबत

मीच माझ्या सोबतीला
आज वाटे छेडले
बंध आमुच्या प्रीतीचे
आज ढिल्ले सोडले

तिचीच प्रीती हो बरी
असे काहीसे वाटले
मग मीच माझ्या सोबतीला
परक्या गटात टाकले

बाह्य भौतिक ती जरी
जखडून तिने ठेवले
ऐनवेळी किनाऱ्याला
माझ्या सोबतीला त्यागले

मग तीच माझी सोबत
दुरून तिने बोलले
एकटा आलास आहे
अन जायचेही एकले

नियाज मुलाणी

अर्थात इथे दोन सोबती अभिप्रेत आहेत. एक स्वतःची  स्वतःला असलेली सोबत आणि एक मानवी सोबत, जी दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला मिळते. आपली स्वतःची स्वतःला असलेली सोबत ही शाश्वत असते निदान मृत्यूपर्यंत तरी. पण मानवी सोबत नाही. ती कधीही परकी होऊ शकते.
कवितेत असं सांगितलं आहे की कवीने मानवी सोबतीला अधिकच महत्व दिलं, त्यासाठी स्वतः स्वतःला दिलेल्या सोबतीला त्याने दुर्लक्षित केला. आणि जेंव्हा वेळ तेंव्हा ती मानवी सोबत सोडून निघून गेली. मग माझी जी स्वतः ची सोबत होती ती मला जवळ घेऊन म्हणाली की आपण येताना ही एकटे येतो आणि जातानाही एकटेच असतो फक्त स्वतःला सोबत असते स्वतःची.

माझे वैराग्य

मी रमलो, मी गुंतलो
मी पाहिले, मी अपेक्षिले
मी खचलो, मी उठलो
मी घेतले, मी वाहिले
मी आनंदलो, मी गुंगलो
मी हरवले, मी शोधले
मी आसुसलो, मी वासलो
मी जपले, मी जोपासले
मी रागलो, मी लोभलो
मी जिंकले, मी हारले
मी भावलो, मी भिलो
मी इंद्रियांना पोसले
मी भावनांना ठेचले
मी प्रीतिभाव वेचले
मी हेतुभाव गायिले
मी जगलो, मी जगविले
मी वैराग्य पाहिले

– नियाज मुलाणी

मी जिवंत आहे…

हसण्यात माझ्या
रडण्यात माझ्या
सुखात माझ्या
दुःखात माझ्या
मी जिवंत आहे
जगण्यात माझ्या

जरासा कटू मी
जरासा मी स्वार्थी
असंयमी तसा मी
हळवा त्या अर्थी
पण स्वभावात माझ्या
मी जिवंत आहे

राग ही जरासा
भयभीत ही होतो
कधी चिंतीत असतो
कधी प्रीतीत असतो
पण भावनात माझ्या
मी जिवंत आहे

शब्दात माझ्या
कवितेत माझ्या
माणसात माझ्या
मरणात माझ्या
मी जिवंत आहे
जगण्यात माझ्या

– नियाज मुलाणी

संवाद

मन हे माझे पाषाणाचे
तू इथे येऊस नाही
शेकडो मी यत्न केले
निर्झरास वाट नाही
अयोग्य तुजला मी सखे
मी योग्यतेचे स्थान नाही
तू कितीही सत्य असली
तेवढा मी सत्य नाही
मान्य मजला आसवांचा
मेघ तो बरसेल काही
त्या आसवांच्या न्यूनतेला
हे सखे मी साध्य नाही
क्षणभराच्या त्या सोबतीला
धन्य मी झालो तरीही
पण सोबतीला, ह्या सखे
प्रीतीचा तो गंध नाही
हे सखे मी जाणतो ग
मी तुझा आरोपी आहे
सिद्धता माझ्या गुन्ह्याची
हाच त्याचा न्याय आहे

जाणते रे मी सख्या हे
मन तुझे पाषाण आहे
त्याच पाषाणाची साक्ष
मम प्रीतीचा  निबंध आहे
पाषाणाने कधीच नाही
अयोग्यता तव सिद्ध झाली
पण पाषाणाला त्या आता
हे समाजाचे वेटोळे आहे
मान्य थिजला तू जरी
घालुनी हे वाद सारे
माझ्याच सोबतीला
एवढे हे प्रश्न का रे?
ना आरोपी तूच आहे
ना गुन्हा कोण्या एकाचा
प्रीतीच्या सत्याला केवळ
मान्यतेचा शाप आहे

– नियाज मुलाणी

आशा

या आकाशातून साऱ्या
रक्तपात माजला होता
सरणावर निजण्यासाठी
भास्कर तो सजला होता

शेकडो मशालींचा ज्याने
संसार थाटला होता
अग्निस तया जाण्याचा
तो थाटच आगळा होता

आजीव हा सारा इथला
काळोखात जो सजला होता
तारकारुपी दुःखाचा, नयनी
अश्रू तो दाटत होता

मिटून लोचन सारे, तो
आसमंत निजला होता
विझवुन मशाली साऱ्या
भास्कर ही मिटला होता

तेवढ्यात तिकडे काजवा
आरास ही सजवत होता
त्या टिंब टिंब दिव्यांनी
प्रकाशित आसमंत होता

कालांतराने तो साऱ्या
मिणमिणत्या विझवत होता
पहाटेचा हा अंधुक वारा
प्रकाश पसरवीत होता

-नियाज मुलाणी

शब्ददूत

हे कृष्णनभा तू भेटी येशी
शब्द थोडके धाडून नेशी
हृदय माझे ते दूर देशील
थिजले, त्यांना स्पंदन देशी

स्पंदनांत तू सांग कुशल मी
मंगल माझे भावगीत ही
शुष्क, निरस प्रांती मी असलो
आठवात शोधली सुखे ती

त्यांचे मंगल पाहून पाहून घे रे
सख्यासमवेत धाडून दे रे
उभा तो तिकडे प्रीतीपीपासू
अचल, अचलावरी अशी ओळख दे रे

पाहून घेशील स्मित ते अलगद
आहे का ओठांवर त्या रे
जर शक्य असेल तर मनात जाऊन
गुपित थोडीशी शोधून घे रे

शोक तिचे ते सदा अबोल रे
मनात ठेवी साठवून सारे
मुखावरी तरळेल हास्य ते
मानसी साठले क्लेश खेद रे

माझ्या ठायी स्थिरला शिशिर रे
वृक्षपर्णापरी भाव माझे रे
तिकडून तिचे गीत पोहोचता
दाटेल मानसी वसंत माझ्या रे

नियाज मुलाणी

निनावी आणि नग्न

येशील का परतुनी तू
प्राण हा दुभागाला
एक होता एक राहील
आभास केवळ राहिला

सत्यता जी प्राप्त झाली
स्वीकार्यता नाही तिला
दाटला तो आवाज माझा
आज आसमंती साठला

येशील का परतुनी तू
सिद्धता ती द्यायला
देशभक्ती, देशप्रेमाचे
प्रमाण द्यायला

हत्यारा ही आज इथे
देशभक्त ठरू लागला
अन देशभक्तीवर माझ्या
धर्माचा शिक्का लादला

येशील का परतुनी तू
आहुती पुनः द्यायला
आहुतीला रे पित्या तव
निरर्थ केवळ राहिला

सांडलेल्या तुझ्या लहुची
साक्ष घेऊन सांगतो
थिजणार न भिणार आता
आवाज मम् नादावतो

दुभंगून जाईल धरती
आसमान ही कापेल रे
ह्या ध्वनीचा नाद होता
मग तो ही तर बिथरेल रे

मग येतील त्या तख्तावरूनी
आदेश आम्हा डांबण्याचे
अनंतात विरला ध्वनी
डांबूनी थिजनार नाही

– नियाज मुलाणी

ती कोण होती?

मला लोक नेहमी विचारतात
ती कोण होती?

ती होती कलाकार
लांबट केस काळेशार
एकच बट गालावर
खट्याळ थोडी सुंदर फार

कुंचले हे शस्त्र तिचे
कमरेत रोवून ही तयार
पॅलेट वरचे रंग जणू
कुंचल्याना लावती धार

ही धार थोडी वेगळी असते
ती असते मऊशार
कधी लाल कधी निळी
कधी नुसती हिरवीगार

कुंचल्यांचे फटके तिचे
अहो किती रंगतदार
फिक्या फिक्या आयुष्याला
लावते चांदण्या तीन चार

माझाही आयुष्य होत
कॅनव्हासपरी फिकं फार
पंढर्यातून रंगीत केलं, तिने
मारून हात तीन चार

जीण जरी माझं होतं
त्यात तिचे प्राण फार
रंगीत केलं जग माझं
कारण ती होती कलाकार

नियाज मुलाणी

स्मशान शांतता


ओठांवरती जे शब्द येतात
जे तिथेच मूक गिळून बसतात
ज्या शब्दांना भावनांची अनुभूती
दाखवत येत नाही, ती
स्मशान शांतता.

काही शब्द एवढेही थोर नसतात
काही शब्द एवढेही शूर नसतात
अश्या शब्दांची जी थडगी
मनात बनतात, ती
स्मशान शांतता.

माणसांचे ढीग च्या ढीग समोर आहेत
काही प्रिय आहेत काही अप्रिय आहेत
तरीपण माझ्या शब्दांच्या मनात घुसमट आहे
प्रत्येक नात्याला कोणत्यातरी शब्दाची
भीती आहे, ती भीती,
स्मशान शांतता

चविष्ट शब्दांनी, माणसाच्या
कानाचे चोचले पुरवणाऱ्या
निस्वार्थ शब्दांच्या स्वार्थी भावनेने
जी उत्पन्न होते, ती
स्मशान शांतता

अस्तित्व आणि खरंखुर अस्तित्व
शब्द आणि व्यक्तिप्रमाणिक शब्द
भावना आणि निस्वार्थ भावना
ह्याच्यामध्ये जी पोकळी आहे, ती
स्मशान शांतता

-नियाज मुलाणी

Design a site like this with WordPress.com
Get started